। खोपोली । प्रतिनिधी ।
झेनिथ धबधबा पर्यटकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या संबंधी उपविभागीय दंडाधिकारी कर्जत, रायगड यांनी फौजदारी आचार संहिता कलम 144 जारी केले असतानासुध्दाही पर्यटक झेनिथ धबधबा परिसरात आनंद साजरा करण्यासाठी येत आहेत. रविवार धबधब्यावर फिरण्यासाठी आलेल्या पुण्यातील युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
या ठिकाणी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. पालिकेनेही आपातकालीन यंत्रणा ठेवली आहे. पर्यटक सर्व यंत्रणेला शह देत कॅमपोलीन क्लबच्या मागच्या बाजूच्या डोंगरालगत असलेल्या वॉटरफॉलवर रविवार 100 ते 200 पर्यटक भटकंती करण्यासाठी आले होते. भागवत कोलपेकवार (28, रा. पुणे) हा आपल्या मित्रांसमवेत आला होता. पावसात फिरत असताना पायघसरून खाली पडला असता कंबरेला मुका मार लागला. घटनास्थळी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने व अपघातग्रस्त टीमने मदत करीत जखमी युवकाला जाखोटिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्याला हालविण्यात आले आहे.