। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील जमिनीच्या वादातून भावकीतील लोकांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या मृत्यू प्रकरणी कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून, आरोपी असलेले तिघेही फरार आहेत.
कर्जत तालुक्यातील धाकटे वेणगाव गावात ही घटना घडली. जमिनीच्या वादातून 9 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास काही लोक सतीश शिंदे या तरुणाच्या घरात घुसले आणि त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात सतिश गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर संबंधित तरुण तेथून पळून गेले होते. जखमी तरुण सतीश शिंदे यांच्यावर रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येत होते. मात्र, उपचार सुरू असतानाच सतिशचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावावर शोककळा पसरली असून, वेणगाव गावातील या प्रकरणची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी घेतली आहे. घरात घुसून मारहाण केल्याचा गुन्हा कर्जत पोलीस ठाण्यात दाखल होता. त्या गुन्ह्यात किरण नितीन शिंदे, मंगेश बाळू जाधव दोघेही रा. धाकटे वेणगाव आणि जय सुनिल साबळे रा. करंजाडे, पनवेल हे आरोपी होते. आता जखमी तरुण सतीश शिंदे यांच्या मृत्यूमुळे हा गुन्हा आणखी गंभीर बनला असून, तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. सतीश शिंदे यांना जखमी करून फरार झालेले तिघे अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.







