। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यातील कात्रज भागातील संतोषनगर भागात जागेच्या वादातून तीन सराईत गुन्हेगारांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कात्रज भागात खळबळ उडाली आहे. शुभम सुभाष चव्हाण असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून अमर साकोरे आणि इतर दोघे अशी आरोपींची नाव आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजमधील संतोषनगरमध्ये रविवारी (दि. 20) पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास शुभम चव्हाण हा घरी जात होता. त्यावेळी अमर साकोरे आणि इतर दोघां साथीदारांनी शुभम याला थांबून जागेच्या व्यवहाराबाबत विचारणा केली. यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला. हा शाब्दिक वाद काहीच वेळात विकोपाला गेला. तेव्हा धोका लक्षात येताच शुभम तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, आरोपी अमर साकोरे आणि दोघांनी त्याचा पाठलाग करत लाकडी बांबू, काठी, दगड, विटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत शुभम याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी अमर साकोरे आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणातील तीनही आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आली असून जागेच्या वादातून शुभम चव्हाण याची हत्या केल्याची माहिती समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.