। नांदेड । प्रतिनिधी ।
नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून एका 25 वर्षीय तरुणाची मुलीच्या बापाने आणि भावाने निर्घृणपणे हत्या केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि.27) सायंकाळी पहेलवान टी हाऊसजवळ घडली. आरोपींनी तरुणाचा पाठलाग केला, त्यानंतर गोळीबार करून डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली. सक्षम गौतम ताटे असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी इतवारा पोलिसांनी पाच जणांना अटक केली तर एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गजानन बालाजी मामीडवार, हेमश मामीडवार, साहिल मामीडवार, सोमेश सुभाष लके अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर वेदांत अशोक कुंडेवकर असे फरार आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सक्षम ताटेचे मामीडवार कुटुंबातील मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ते दोघे पळून जाऊन लग्न करणार होते. ही बाब समजल्यानंतर मुलीचे वडील गजानन मामीडवार आणि भावाने त्याची समजूत काढली. ‘माझ्या मुलीशी पुन्हा बोलल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती’, असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. परंतु त्यानंतरही प्रेमप्रकरण सुरूच असल्याने गुरुवारी सक्षम ताटे याला आरोपींनी जुना गंज भागातील पैलवान टी हाऊस परिसरात सायंकाळी 5.20 वाजताच्या सुमारास बोलावले. यावेळी त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानं संशयित आरोपी गजानन मामीलवाड, साहिल गजानन मामीलवाड व अन्य तिघांनी सक्षम ताटे याला मारहाण केली. तिथून पळ काढल्यानंतर त्याच्या दिशेने गोळीबार केला, मात्र गोळी कोणालाही लागली नाही. त्यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली.
प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या
