नेरळ पोलिसांची कामगिरी
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ परिसरात गेली 20 वर्षे गांजा विकणाऱ्या तरूणाचा शोध नेरळ पोलिसांकडून सुरु होता. अखेर त्या तरुणाला महाबळेश्वर येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 2006 पासून गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्याने नेरळ पोलिसांचे कौतुक होत आहे.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वे गेटजवळ बोलेरो जीपने बेकायदेशीर अवैधरित्या गांजा वाहतूक करताना रिक्षाला ठोकर मारून अपघात केला होता. रिक्षाला ठोकर मारून पळून जात असताना पोलिसांकडून पकडले जाऊ नये, म्हणून गांजासह जीप बेवारस स्थितीत सोडून आरोपी फरार झाला होता. त्यावेळी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून या गुन्ह्यातील 145 किलो 60 ग्राम वजनाचा बेकायदेशीर गांजा आढळून आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना सन 2006 पासून पळून गेलेल्या फरार आरोपीला पकडण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला काही धागेदोरे मिळतात काय? अशी कामगिरी सोपविली होती. या टीमकडून गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार सचिन वाघमारे, पोलीस अंमलदार राजाभाऊ केकान, पोलीस अंमलदार आशू बेंद्रे, पोलीस अंमलदार विनोद वांगणेकर यांनी तांत्रिक माहिती आणि विश्लेषणाद्वारे तसेच गोपनीय बातमीदारामार्फत 2006 पासून फरार असलेला आरोपी विलास मनोहर मोहिते यांचा शोध घेतला.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळील अहिल्यानगर येथून राहत असलेल्या या तरुणाला तो बेसावध असताना नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडले. त्यास महाबळेश्वर सातारा येथून ताब्यात घेऊन नेरळ पोलीस ठाणे येथे आणून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, 2006 मध्ये 145 किलो गांजा विक्रीसाठी आणला असल्याची कबुली आरोपी तरुणाने दिली आहे. नेरळ पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.






