तरुणाईने हिंदू मुस्लिम ऐक्य जपावे : संजय गुंजाळ

| मुरूड | वार्ताहर | कोकण मराठी साहित्य परिषद मुरुड जंजिरा शाखा आणि अंजुमन डिग्री कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १२ वाजता मराठी राजभाषा दिनानिमित्त अंजुमन डिग्री कॉलेज येथे काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

अंजुमन डिग्री कॉलेजच्या सभागृहात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोमसाप मुरुड शाखा अध्यक्ष संजयजी गुंजाळ उपस्थित होते, तसेच व्यासपीठावर अंजुमन इस्लामचे चेअरमन जैनुद्दीन कादिरी, सदस्य इस्माईल शेख,प्राचार्य डॉ. साजिद शेख, प्राध्यापक शोएब सर, कोमसाप मुरुडचे कार्याध्यक्ष अरुणजी बागडे, उपाध्यक्षा उषा खोत, खजिनदार प्रतिभा जोशी, सहसचिव प्रतिभा मोहिले, सह-खजिनदार उर्मिला नामजोशी, जिल्हा प्रतिनिधी कवी सिद्धेश लखमदे, मुरुड शाखा युवाशक्ती प्रमुख आशिष पाटील उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
त्यानंतर अंजुमन डिग्री कॉलेजमधील 10 विद्यार्थी, विद्यार्थिनींनी काव्य संमेलनात आपले स्वरचित काव्य मराठी भाषेत सादर करून कविसंमेलन रंगातदार केले.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन उर्दू भाषिक मुलीने अगदी सहजपणे मराठीत केले. संजय गुंजाळ यांनी त्यांच्या मनोगतात अंजुमन इस्लाम महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून ते यशस्वी करण्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच तरुणाईने हिंदू मुस्लिम ऐक्य जपावे हा संदेश दिला व मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता कोकण मराठी साहित्य परिषद मुरुड-जंजिरा युवाशक्ती शाखेने आयोजित केलेल्या पत्र मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. अंजुमन कॉलेजच्या विद्यार्थिनींनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Exit mobile version