तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
| तळा | वार्ताहर |
तालुक्यातील तरुणांनी नोकरीच्या शोधात मुंबई, पुणे येथे न जाता विविध फळप्रक्रिया उद्योग उभारले पाहिजेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी वावेहवेली येथे केले. विविध फळांवरील छोटी फळप्रक्रिया युनिट प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमार्फत सुरु करावीत, यासाठी कृषी विभाग अनुदान देण्यासाठी सहकार्य करेल, असेही ते म्हणाले. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या वावेहवेली येथील लाभार्थी सागर पारावे यांच्या काजू प्रक्रिया युनिटचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, तळा तालुक्यात काजू लागवडीस पोषक वातावरण आहे व बऱ्याच शेतकऱ्यांचा काजू लागवडीकडे कलसुद्धा वाढत आहे, तसेच जुन्या उत्पादनक्षम काजू बागासुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने काजू प्रक्रियेस मोठ्या प्रमाणावर वाव आहे.
यावेळी सागर पारावे यांनी आपल्या प्रक्रिया युनिटची माहिती उपस्थितांना दिली या प्रक्रिया युनिटमुळे गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले तसेच काजू प्रकल्प उभारणीमध्ये कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची मदत झाल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रक्रिया युनिटचा परिसरातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा फायदा होणार असून, त्यांनी उत्पादित केलेल्या काजूला बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पसाठी कृषी विभाग व स्वदेश फाऊंडेशन यांनी सहकार्य केले असून, योजनेबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व आरडीसीसी बँकेचे संचालक ज्ञानेश्वर भोईर, मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव, आत्मा सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन लोखंडे, नोनो सिड कंपनीचे प्रतिनिधी महाडिक, यशवंत पारावे, योगीता पारावे, सागर पारावे, श्वेता पारावे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.