पीएनपी एज्युकेशन सोसायटी व आयईएसपीचा कोर्स करिता पुढाकार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पीएनपी एज्युकेशन सोसायटी व आयईएसपी यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व इतर ठिकाणी तरुणांच्या रोजगाराकरिता नव-नवीन कोर्सचे नवे दालन खुले केले जाणार आहे. पीएनपी एज्युकेशन सोसायटीने कायमचं दर्जेदार शिक्षणासोबतचं, विविध संस्थांमध्ये नोकरी मिळवून दिलेल्या आहेत. तसेच, हे विविध कोर्स पूर्ण केल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे, असे मत पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी केला आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि.16) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अलिबागमधील पीएनपी नाट्यगृह येथे आयोजित केला असून, या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची व तज्ज्ञांची उपस्थिती असणार आहे.
वाढती बेरोजगारी रोखण्यासाठी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्याला लागून नवी मुंबई विमानतळ उभे राहिले आहे. या विमानतळामध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी पीएनपी एज्युकेशन सोसायटी व आयईएसपी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. योग्य प्रशिक्षण व विश्वासर्हता मार्गदर्शन आणि उज्ज्वल भविष्याची खात्री या कार्यक्रमाच्या मार्फत तरुणांना मिळणार आहे. या कार्यक्रमामध्ये विमानतळ रिलेटेड कोर्सेस, नोकऱ्या, याच्या संदर्भात सविस्तर माहिती, अनुभवी तज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. करिअर व काऊन्सेलिंग व शंका निरसन, प्रशिक्षण व प्लेसमेंटची संपूर्ण माहिती कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. हा कार्यक्रम अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहामध्ये शनिवारी (दि.16) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास होणार आहे. तरी जिल्ह्यातील तरुणांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून रोजगारांची संधी उपलब्ध करून घ्यावी असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.
