| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आणि जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथे युवा काँग्रेसच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा शुभारंभ शनिवारी (दि.28) अलिबागमधील रविकिरण हॉटेलमधील सभागृहात झाला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार ॲड. रामहरी रूपनवर, एसटी काँग्रेसचे नेते श्रीरंग बर्गे, काँग्रेस नेत्या राणी अग्रवाल, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, ॲड. श्रद्धा ठाकूर, योगेश मगर, भास्कर चव्हाण, मार्तंड नाखवा, अखलाख शिदोरी आणि नयना घरत हे मान्यवरांसह जिल्ह्यातील युवा कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्ह्यातील सुमारे 125 तरुण कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. शिबिरात विविध विषयांवर सत्रे आयोजित करण्यात आली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे शिबीर तरुणांना वैचारिक व संघटनात्मक दृष्टिकोनातून सज्ज करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. रविवारी (दि.29) शिबीराची सांगता होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
दरम्यान, जो दुसऱ्यांना मोठे करतो, तोच खरा मोठा होतो! या विचारातून ॲड. रामहरी रूपनवर यांनी तरुण कार्यकर्त्यांना प्रेरित करत काँग्रेसची विचारधारा, ऐतिहासिक वाटचाल आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पक्षाशी एकनिष्ठ राहणे हेच खरे योगदान आहे. रायगड जिल्ह्यातील तरुणांसाठी काँग्रेसकडे संधीचा मोठा खजिना आहे. आपल्याला शून्यापासून सुरुवात करून पुन्हा काँग्रेसची ताकद निर्माण करायची आहे, असा मोलाचा सल्ला घरत यांनी दिला.