महाजने एसटी बस सुरू करण्याची मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रस्त्याचे कारण सांगून अलिबाग आगारातून सुटणारी एसटी बस वावेपर्यंतच पाठविली जात आहे. त्यामुळे महाजनेसह बेलोशी, सागवाडी, पाठवाडी, मठवाडी, दिवीवाडी आदी गावे, वाड्यांमधील प्रवासी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींचे प्रचंड हाल होत आहेत. महाजनेपर्यंत एसटी सुरु करण्यात यावी, यासाठी बेलोशी व वळवली येथील तरुण एकवटले आहेत.
बेलोशीतील राकेश भोपीसह निनाद वारगे, अंजिक्य मढवी, प्रवीण पाटील, वळवली येथील संदीप भोईर या तरुणांनी आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन महाजनेपर्यंत बससेवा सुरु करण्यात यावी, या मागणीचे पत्र दिले. यावेळी पाहणी करून तात्काळ बससेवा सुरु करण्याचे आश्वासन आगार व्यवस्थापकांकडून देण्यात आले.
अलिबाग एसटी बसस्थानकातून सकाळी पावणे सहा, सव्वा आठ, दुपारी साडेतीन, सायंकाळी साडेचार, रात्री सव्वा आठ तसेच रेवदंडा बस स्थानकातून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महाजने बस नियमित सोडली जाते. महाजने येथे आल्यावर अलिबाग, रेवदंडा व इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना या बसचा कायमच आधार मिळाला आहे. अलिबाग आगारातील या बसेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. शाळा, महाविद्यालयासह नोकरी-व्यवसायानिमित्त रोहा, मुरूड, अलिबाग, पेण, पनवेल येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी बस उपयोगी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून बेलोशी ते महाजने रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. काँक्रिटीकरण केले जात आहे. रस्त्याच्या एका बाजूने हे काम सुरु असून, वाहतुकीसाठी पर्यायी रस्तादेखील देण्यात आला आहे. मात्र, अलिबाग आगारातून सुटणाऱ्या एसटी बसेस महाजने येथे न पाठविता वावेपर्यंतच सोडल्या जात आहेत. त्याचा फटका महाजने, बेलोशी, पाटवाडी, सागवाडी, परळवाडी, दिवीवाडी, मठवाडी येथील प्रवाशांना बसत आहे. वावेपर्यंत एसटी असल्याने प्रवाशांना साडेचार किलोमीटरपर्यंत पायपीट करत जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामगार महिला व इतर प्रवाशांना त्यांच्या निश्चितस्थळी पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
रस्त्याचे काम सुरु असल्याचे कारण दाखवून बस महाजनेपर्यंत पाठविली जात नाही. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. ही बाब बेलोशी व वळवली येथील तरुणांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मंगळवारी एसटी बस आगारात जाऊन आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांची भेट घेतली. त्यांना समस्येची जाणीव करून देत महाजनेपर्यंत बससेवा सुरु ठेवा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. आगार व्यवस्थापक देवरे यांनी तात्काळ वाहतूक निरीक्षक यांना बोलावून तात्काळ जागेची पाहणी करून बससेवा सुरु करण्याची सूचना केली. काही अडचण असल्यास तेथील स्थानिकांशी संवाद साधून तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करा, असेही सुचविले. आगार व्यवस्थापक यांच्याकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे राकेश भोपीसह निनाद आदी तरुणांनी समाधान व्यक्त केले.
