भारताचा न्यूझीलंडवर वर्चस्वपूर्ण विजय; मुशीर खानची अष्टपैलू कामगिरी
| ब्लोमफॉन्टेन | वृत्तसंस्था |
मुशीर खानच्या (126 चेंडूंत 131 धावा व 10 धावांत दोन बळी) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताने युवा (19 वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘सुपर सिक्स’ गटात न्यूझीलंडवर 214 धावांनी वर्चस्वपूर्ण विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 295 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 81 धावांतच आटोपला. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या ऑस्कर जॅक्सन (19), झ्ॉक किमग (16), ॲलेक्स थॉम्पसन (12) व जेम्स नेल्सन (10) वगळता कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून फिरकीपटू सौम्य पांडेने (4/19) चांगली गोलंदाजी केली. त्याला राज लिम्बानी (2/17), मुशीरने चांगली साथ दिली. नमन तिवारी व अर्शिन कुलकर्णी यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत विजयात योगदान दिले.
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अर्शिनच्या (9) रूपात संघाला पहिला धक्का बसला. यानंतर सलामीवीर आदर्श सिंग (52) व मुशीर यांनी दुसऱ्या गडयासाठी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला सुस्थितीत पोहोचवले. आदर्श बाद झाल्यावर कर्णधार उदय सहारनने (34) मुशीरच्या साथीने संघाच्या धावसंख्येत भर घातली. सहारन माघारी परतल्यानंतर मुशीरने सर्व सूत्रे आपल्या हातात घेत चमक दाखवली व संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचवले. न्यूझीलंडकडून मेसन क्लार्कने (4/62) चांगली गोलंदाजी केली.