विदेशी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना कोट्यवधींचा गंडा

ऑल इंडिया सिफेरर्स युनियन आक्रमक

। पनवेल । प्रतिनिधी ।

विदेशात शिपिंग कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अनेक बेरोजगार तरुणांची तब्बल 1 कोटी 73 लाख 81 हजार 400 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खारघर येथील अव्हॉन नेव्हिगॉर्झ मरीन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ऑल इंडिया सिफेरर्स युनियन आक्रमक झाली आहे.

खारघर सेक्टर-7 येथील कार्यालयातून संबंधित कंपनीकडून मलेशिया तसेच इतर देशांमध्ये शिपिंग क्षेत्रात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले जात होते. नोकरीसाठी सर्व्हिस चार्ज, व्हिसा प्रक्रिया, विमान तिकीट व इतर खर्चाच्या नावाखाली उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

बेरोजगार तरुणांनी कंपनीच्या प्रतिनिधींच्या सांगण्यावरून विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यात आले. मात्र, पैसे भरल्यानंतरही नोकरी, व्हिसा किंवा परदेश प्रवासाबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नाही. उलट संबंधितांनी उमेदवारांशी संपर्क टाळण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. खारघर येथील कार्यालयदेखील बंद असल्याचे आढळून आले. पीडितांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर, त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि आपल्या पथकाला खारघर पोलीस ठाण्यात पाठवले. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यानंतर संबंधितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

या प्रकरणात कंपनीचे कथित मालक, व्यवस्थापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी संगनमताने नोकरीच्या आमिषाने तरुणांकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून, संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. याबाबत ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे अध्यक्ष संजय पवार यांनी नवी मुंबईचे सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे यांना लेखी निवेदन देऊन संबंधित शिपिंग कंपनीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Exit mobile version