युसुफ मेहेरअली सेंटर करणार वेलटवाडीचे पुर्नवसन

डॉ. जी. जी. पारिख यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जून 2020 मधील अतिवृष्टीमध्ये भूस्खलनामुळे विस्थापित झालेल्या अलिबाग तालुक्यातील खानाव-वेलटवाडी येथील 23 आदिवासी कुटुंबांचे तारा येथील युसुफ मेहेरअली सेंटरच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने पुनर्वसन करण्यात येणार आहे. सेंटरचे संस्थापक व स्वांतंत्र्यसैनिक डॉ. जी. जी. पारिख यांनी यासंदर्भात मंगळवारी येथे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेतली. या बैठकीत जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे डॉ पारिख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत हद्दीतील वेलटवाडी येथे जून 2020 मध्ये झालेल्या निसर्गचक्री वादळामुळे येथील डोंगरावर असलेल्या 23 आदिवासींच्या घरांची पडझड झाली. त्यामुळे तिथे आदिवासींना राहाणे कठीण होते म्हणून जिल्हाधिका-यांचे आदेशानुसार अलिबाग तहसिलदार यांनी तातडीने पत्राशेड बांधून राहाण्याची व्यवस्था केली होती. तर खानाव ग्रामपंचायतीने स्वखर्चाने डोंगरातून पाईप लाईन द्वारा पाण्याची व्यवस्था केली होती. हे आदिवासी बांधव शेडच्या बाजूच्या वन जमिनीवर कच्ची झोपडी बांधून राहू लागले होते. ग्रामस्थ म्हणून ग्रामपंचयतीनेही त्यांना सहकार्य केले. परंतु वन विभागाने वन कायदा नियम शर्तीने नोटीस बजावून व अनेकदा तोंडी सांगून आदिवासींना सदर जागा सोडण्यास सांगितले आहे. त्यामुळे सदर 23 कुटुंबांची परवड झाली आहे. कुटुंबाची जबाबदारी म्हणून त्यांना मजुरीसाठी भटकावे लागते. अशावेळी या आदिवासींच्या लहान मुलांची हेळसांड होत आहे. त्यामुळे वेलटवाडी येथील आपत्तीग्रस्त आदिवासी बांधवांसमोर मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वेलटवाडी येथील या आदिवासी बांधवांचे सुनियोजित पुनर्वसन व्हावे यासाठी युसुफ मेहेरअली सेंटरचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. जी.जी. पारिख यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेतली.

सदर 23 कुटुंबे व त्यांच्या वाढीव कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी समाज मंदिर, बालवाडीसह पर्यायी जागा द्यावी. आहे त्याच जागेवर पुनर्वसन व्हावे. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी नियम 2006-2008 सुधारणा नियम 12 मधील कलम 3 पोट कलम 2 अन्वेय पुनर्वसन करावे. संबंधित सर्व आदिवासींचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत सदर जागेवरुन आदिवासींना हुसकावण्याचा प्रयत्न होऊ नये. संबंधित वन अधिकारी कर्मचारी यांना त्याबाबत प्रतिबंध करावा. सदर आदिवासींना सनद देवून ते लागवडीत आणीत असलेल्या जमिनीची शासकीय पातळीवर नोंद करुन दखल घेतली आहे. सदर सनद प्राप्त जमिनी सातबारावर नोंद करुन त्यांना भोगवटदार करण्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठी तहसिलदार अलिबाग यांना आदेश द्यावेत. या मागण्या डॉ. पारिख यांनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या समोर मांडल्या.
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी वेलटवाडी आदिवासींच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न येत्या आठ दिवसांत सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे. वेलटवाडीतील आदिवासींचे नियोजनबद्ध पुनर्वसन व्हावे यासाठी युसुफ मेहेरअली सेंटरच्या माध्यमातून काम करण्यात येईल, अशी माहिती डॉ. जी.जी. पारिख यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी येथील रायगड जिल्हा सहकारी पथसंस्थांचा महासंघ कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस सेंटरचे सहसचिव मधू मोहिते, उषाबेन शहा, अनिल हेब्बर, गुड्डी शा.ल., तसेच जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ड. श्रद्धा ठाकूर, तालुका अध्यक्ष योगेश मगर हेही उपस्थित होते.

Exit mobile version