युसूफ पठाणची वादळी खेळी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

जोहान्सबर्ग बफेलोस संघाकडून खेळणाऱ्या युसूफ पठाणने शुक्रवारी झिम्बाब्वे आफ्रो टी-10 लीगमध्ये वादळी खेळी केली. संघाला विजयासाठी 46 चेंडूंत 126 धावांची आवश्यकता असताना युसूफने डर्बन कलंदर्स संघाच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले. त्यात युसूफच्या तावडीत पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीर सापडला अन्‌‍ त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. युसूफने 26 चेंडूंत 4 चौकार व 9 षटकार ठोकताना नाबाद 82 धावा करून संघाला 1 चेंडू व 6 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करताना कलंदर्स संघाकडून आंद्रे फ्लेचरने 14 चेंडूंत 39 धावा आणि आसीफ अलीने 12 चेंडूंत 32 धावांची खेळी केली. निक वेल्चनेही 9 चेंडूंत नाबाद 24 धावा चोपताना संघाला 4 बाद 140 धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात बफेलोस संघाचे आघाडीचे तीन फलंदाज, मोहम्मद हाफिज (17), टॉम बँटन (4) आणि विल स्मीद (16) हे झटपट माघारी परतले. रवी बोपाराही 1 धाव करून बाद झाला. बफलोस संघाला 46 चेंडूंत 126 धावांची गरज असताना युसूफने चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि 9.5 षटकांत 4 बाद 142 धावा करून संघाचा विजय निश्चित केला.

Exit mobile version