सेंट मेरी स्कूलच्या फी वाढीबाबत युवासेना आक्रमक

गटविकास अधिकारी, शिक्षण विभागाला निवेदन

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील खरसुंडी येथे असलेल्या सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अतिरिक्त वाढवलेल्या 30 ते 40 टक्के फीमुळे मागील एक आठवड्यापासून पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षात अचानक भरमसाठ फी वाढल्यामुळे पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जोपर्यंत फी कमी होत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला.

दरम्यान, शाळा व्यवस्थापकांच्या मनमानी कारभारामुळे पालकांनी आपल्या व्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या कॉलेज कक्षाच्या पदाधिकार्‍यांकडे मांडल्या असता युवासेना कॉलेज कक्ष आक्रमक होत 10 एप्रिल रोजी खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व शिक्षण विभागाला फी कमी करण्यासाठी निवेदन देत लवकरात लवकर फी कमी करावी, अशी मागणी केली आहे. जर शाळा व्यवस्थापनाने फी कमी न केल्यास ठाकरे गट युवा स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवासेनेच्या कॉलेज कक्षचे तालुका अधिकारी प्रतीक शिंदे यांनी यावेळी दिला आहे.

यावेळी युवासेना उपजिल्हाधिकारी महेश पाटील, युवासेना कॉलेज कक्ष कर्जत खालापूर विधानसभा अधिकारी सुजल गायकवाड, उपअधिकारी धर्मेंश परमार, प्रतिक शिंदे, जय खेडकर, हरेश कराळे, विनोद पांडे, रिया मालुसरे, शरद घोडविंदे, किशन चौहान, वैभव दळवी, एकनाथ कोळंबे आदींसह पालक मच्छिंद्र पोलेकर, संतोष नलावडे, हेमंत चव्हान, दृष्टी गुजर, नितीन पाटील, दीपक पाटील, जितेंद्र बोदार्डे, महेश पाटील, गोपीचंद तुपे, अश्‍विनी बोदार्डे हे उपस्थित होते.

Exit mobile version