संगमेश्वर मुळे उपविजेता; अक्षय पाटीलला मेन ऑफ द सीरिज
। अलिबाग । वार्ताहर ।
मुळे येथे रविवार, दि. 10 एप्रिल रोजी शेतकरी कामगार पक्ष चषक ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात नवखार येथील युवराज इलेव्हन संघाने संगमेश्वर मुळे संघाचा पराभव करुन चषक आपल्या नावी केला. एस.डी. इलेव्हन मुळे आयोजित शेतकरी कामगार पक्ष चषक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत एकूण 24 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन लोणारे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सतीश म्हात्रे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी वरसोली ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेश घरत, मुळे ग्रा.पं. सरपंच रोहिणी संतोष पाटील, उपसरंपच रेश्मा राजेश घरत, सर्व सदस्य तसेच मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ व पंचक्रोशितील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेचा अंतिम सामना युवराज इलेव्हन नवखार विरुद्ध संगमेश्वर मुळे या दोन संघात झाला. या अटीतटीच्या सामन्यात युवराज इलेव्हनने बाजी मारली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास जि.प. माजी सदस्या चित्रा पाटील, शेकाप युवा नेते युवराज पाटील, मुळे सरपंच, उपसरपंच यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. शेकाप नेते दिलीप भोईर यांनी या स्पर्धेस सदिच्छा भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. तसेच खेळाडूंना प्रोत्साहित केले.
विजेत्या युवराज इलेव्हन संघाला 51,111 रुपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर, उपविजेत्या संगमेश्वर मुळे संघास 25000 रुपये रोख व आकर्षक चषक प्रदान करण्यात आला. तृतीय क्रमांक पटकाविणार्या शिवशक्ती लोणारे संघास दहा हजार रुपये रोख व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत बेस्ट बॅट्समन म्हणून संगमेश्वर मुळे संघाचा सुदर्शन पाटील, बेस्ट बॉलर शिवशक्ती लोणारेचा अरुण पाटील, तर मेन ऑफ द सीरिजचा पुरस्कार युवराज इलेव्हन संघाच्या अक्षय पाटील याला देण्यात आला. या सर्वांना आकर्षक चषक व रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरिवण्यात आले.