झाकिर हुसेन यांना कर्जतच्या तबल्याची भुरळ

| कर्जत | प्रतिनिधी |

जागतिक कीर्तीचे तबलावादक दिवंगत झाकिर हुसेन हे आज या जगात नाहीत, परंतु त्यांच्याबाबतची कर्जतची एक आठवण यानिमित्ताने पुढे येत आहे. याबाबतची सविस्तर आठवण कर्जतचे ज्येष्ठ नागरिक विजय हरिश्‍चंद्रे यांनी करून दिली आहे.

झाकिर हुसेन हे त्यांचे स्नेही रवि आरेकर यांच्याकडे कर्जतला आले होते. रात्री आयत्यावेळी संगीतप्रेमींची मैफिल बसली, रवि यांच्याकडे तबले होते. परंतु, झाकिर हुसेन यांना हवा तसा तबला आरेकर यांच्याकडे नसल्याने हुसेन यांनी दुसरा तबला उपलब्ध होईल का, अशी मागणी केली. आरेकर यांनी रात्रीच्या वेळी चांगला तबला मिळतो का, यासाठी शोध घेतला. त्यावेळी कर्जतमध्ये हरिश्‍चंद्रे कुटुंब तबला बनविण्याचे काम करीत असल्याने आरेकर यांनी हरिश्‍चंद्रे यांच्याकडे तबला मिळू शकतो का, या उद्देशाने त्यांच्याशी संपर्क साधला.

आरेकर आणि हरिश्‍चंद्रे कुटुंबाचे पूर्वीपासून जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे हक्काने रात्री रवि आरेकर यांनी हरिश्‍चंद्रे यांना तबल्याची अडचण सांगितली व एखादा चांगला तबला असेल तर तात्पुरता द्यावा, अशी मागणी केली. तेव्हा हरिश्‍चंद्रे यांनी लगेचच त्यांना आपल्या दुकानातील तयार केलेला एक चांगला तबला दिला व सांगितले की, हा तबला गिर्‍हाईकाचा ऑर्डरचा आहे. नंतर मला परत आणून द्या. त्यानंतर दोन दिवसांनी ज्या गिर्‍हाईकाचा तबला होता ते घायला आले. तेव्हा हरिश्‍चंद्रे यांनी आपल्या दुकानातील माणसाला रवि आरेकर यांच्याकडून तबला घेऊन येण्यास पाठवले. त्यावेळी रवी आरेकर यांनी दुकानात येऊन दत्ता हरिश्‍चंद्रे यांना सांगितले की, झाकिर यांना तो तबला फार आवडला, अतिशय सुंदर तयार केला असल्यामुळे हा तबला मी घेऊन जातो, असे झाकिर हुसेन यांनी सांगितले. जे काय पैसे असतील ते त्यांना देऊन टाक, पण हा तबला मला पाहिजे. यावरून उस्ताद झाकिर हुसेन यांना त्यावेळी कर्जतमधील तबल्याची जणू भुरळच पडली होती. ज्या गिर्‍हाईकाचा तबला होता ते गिर्‍हाईक म्हणजे कर्जत येथील रघुनाथ दगडे यांनी तो तबला विकत घेतला होता. त्यांना सविस्तर सांगितल्यावर, त्यांनाही आनंद वाटला, त्यांनी काही हरकत नाही, असे मोठ्या मनाने सांगितले. त्यांना लगेच नवीन तबला दिवंगत दत्ता हरिश्‍चंद्रे याने तयार करून दिला.

Exit mobile version