झी स्कूलने आदिवासी मुलांना डावळले

प्रवेश प्रक्रिया थांबविण्याची मागणी

। नागोठणे । वार्ताहर ।

नागोठण्याजवळील सुकेळी येथील जिंदाल माउंट लिटेरा झी स्कूलमध्ये सिनिअर के.जी. या वर्गातील प्रवेशासाठी आर्थिक दुर्बल ग्रामपंचायत कोट्यात सधन असलेल्या पाच विद्यार्थ्यांची चुकीच्या पद्धतीने निवडलेली यादी सरपंच व ग्रामसेवक यांनी शाळेकडे नुकतीच सादर केली आहे. या यादीमध्ये आदिवासी समाजातील एकाही विद्यार्थ्यांचा समावेश नसल्याने ही प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याची लेखी मागणी ऐनघरचे उपसरपंच भगवान शीद व सदस्य विनोद निरगुडा यांनी शाळा व्यवस्थापनाकडे केली आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकविला जात असलेली जिंदाल माउंट लिटेरा झी स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुकेळी येथील जिंदाल समूहाच्या कंपनी व्यवस्थापनाकडून चालविली जाते. शाळेतील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तत्कालीन खासदार अनंत गीते यांना आमंत्रण करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी गेले होते. त्यावेळी ऐनघर पंचक्रोशीतील आर्थिक दुर्बल घटक असलेल्या तसेच पिवळे रेशन कार्ड धारक व दारिद्र्यरेषेखाली असलेल्या गरीब कुटुंबातील पाच विद्यार्थ्यांना शाळेने दत्तक घेऊन त्यांचा इयत्ता 12 वी पर्यंतच्या सर्व खर्च करावा, अशी इच्छाही अनंत गीते यांनी व्यक्त केली होती.
त्यानुसार सन 2016 पासून ऐनघर ग्रामपंचायतीने पाच विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्या नावांची यादी जिंदाल शाळा व्यवस्थापनाला द्यायचे ठरले होते. गेले आठ वर्ष शाळेतील या पाच विद्यार्थ्यांची पवेश प्रक्रिया सुरळीत सुरू होती. असे असताना यावर्षी प्रवेशासाठी पाच आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्ज ग्रामपंचायतीकडे आलेले असतानाही ऐनघर ग्रामपंचायतीकडून निवडण्यात आलेल्या या वर्षाच्या प्रवेशाच्या यादीत एकाही आदिवासी विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला नाही. उलट जे पालक सधन आहेत व आपल्या मुलांना फी भरून शिक्षण देऊ शकतात अशा इतर समाजाच्या मुलांची निवड ग्रामपंचायत कोट्यातून करून चुकीच्या पद्धतीने यादी तयार करण्यात आल्याचा आरोपही उपसरपंच भगवान शीद व सदस्य विनोद निरगुडा यांनी केला आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत कोट्यातील प्रवेशाच्या यादीत आदिवासी विद्यार्थ्यांचा समावेश न झाल्यास आपण आदिवासी समाजाला सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचे भगवान शीद व विनोद निरगुडा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, ग्रामपंचायतीकडून जोपर्यंत अधिकृत यादी येत नाही तोपर्यंत आपण ही प्रवेश प्रक्रिया सुरू करणार नसल्याचे जिंदाल झी स्कूलच्या शाळा व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version