खाणविरोधकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
| गडचिरोली | प्रतिनिधी |
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या झेंडेपार लोह खाणींसंबंधातील पर्यावरणीय जनसुनावणीत आपले मत मांडण्यासाठी जाणाऱ्या विविध पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच अडविले आणि ताब्यात घेऊन गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये काही काळासाठी स्थानबद्ध केले होते.
सोमवारी शेवटच्या दिवशी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, भाई शामसुंदर उराडे, डॉ. महेश कोपूलवार, ॲड. जगदीश मेश्राम, देवराव चवळे, रोहिदास राऊत, राज बन्सोड, कॉ. अमोल मारकवार, ॲड.विवेक कोलते, संजय कोचे, इंद्रपाल गेडाम, ॲड. लालसू नोगोटी, सैनू गोटा यांच्यासह अनेक पारंपरिक इलाके आणि ग्रामसभांनी झेंडेपारच्या लोह खनिज उत्खननाच्या जनसुनावणीला लेखी आक्षेप घेत जोरदार विरोध केला होता. यामुळे विरोधात कोणी काही बोलू नये यासाठी मोठा फौजफाटा तैनात करुन विरोधकांना जनसुनावणीत जाण्यासाठी अडविण्यात येवून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. असा आरोपही खाण विरोधकांनी केला आहे.
खदान समर्थक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने प्रवेश देणाऱ्या जिल्हा प्रशासनाने पोलिसांना सामोर करुन जनसूनावणीत सहभागी होवू न दिलेल्या खाण विरोधकांमध्ये कॉ. महेश कोपूलवार, भाई रामदास जराते, भाई शामसुंदर उराडे, अक्षय कोसनकर, कॉ. अमोल मारकवार, संजय कोचे, राज बन्सोड, प्रतिक डांगे, प्रफुल्ल रायपूरे, सतिश दुर्गमवार, कुसूम आलाम, ॲड. लालसू नोगोटी, नितीन पदा, दिनेश वड्डे यांचा समावेश होता. दहशतीचे वातावरण निर्माण करुन एकतर्फी जनसुनावणी पार पाडण्याच्या प्रयत्नाविरोधात पाठपुरावा करण्याचा इशाराही खाण विरोधकांनी प्रशासनाला दिला आहे.