| अलिबाग । प्रातिनिधी ।
रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील निरीक्षक राजाराम मोरे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेने कार्यासन बदलण्याची कारवाई केली आहे. सदर निरीक्षकाने दाखला देत असताना गैरकारभार केल्याची तक्रार माजी जिल्हा परिषद सदस्यांनी केली होती. या तक्रारीची शहानिशा करीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी तत्काळ कारवाई करीत सदर निरीक्षकांचे कार्यासन बदलून त्यांना दुसरे कार्यासन देण्याची कारवाई केली आहे.
जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागात पोलादपूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे व कार्यकर्ते शासनाच्या योजनेतील कामाबाबत दाखला घेण्यासाठी आले होते. हा दाखला देण्यासाठी निरीक्षक राजाराम मोरे यांनी त्यांच्याकडे आर्थिक मागणी करीत गैरकारभार केला. याबाबत चंद्रकांत कळंबे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांची भेट घेत सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
तक्रार प्राप्त होताच डॉ. भरत बास्टेवाड यांनी लागलीच समाजकल्याण अधिकारी डॉ. शामराव कदम यांना याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. डॉ. शामराव कदम यांनी तत्काळ चौकशी करीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला. अहवाल प्राप्त होताच डॉ. भरत बास्टेवाड यांनी समाजकल्याण निरीक्षक राजाराम मोरे यांच्याविरूध्द कारवाईचा बडगा उगारून त्यांचे कार्यासन बदलून त्याना दुसरे कार्यासन देण्याची कारवाई केली आहे.