अधिकाऱ्यांनी अनुभवला भात लावणीचा अनुभव

| अलिबाग | प्रतिनिधी |

वातानुकूलित केबिनमध्ये बसून जिल्ह्याची सूत्रे हालविणारे जिल्हा परिषदेचे अधिकारी शेतात पोहचले. त्यांनी चिखलात उतरून भात लावणीचा अनुभव शुक्रवारी (दि.11) घेतला. यावेळी त्यांनी भाताची रोपे खणून काढून भात लावणी केली. एक दिवस शेतकऱ्यांसाठी या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन भात पिक लागवडीचा कार्यक्रम करुन शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.

जिल्ह्यामध्ये सध्या भात लावणीची लगबग सूरू झाली आहे. शेतकरी भात लावणीच्या मग्न होऊ लागला आहे. एक दिवस शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आला. कृषी विभागामार्फत सर्व खाते प्रमुख यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन एक दिवस शेतकऱ्यांसाठी या संकल्पनेतून भात पिक लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत अलिबाग तालुक्यातील भाल येथील एका शेतकऱ्याच्या शेतावर भात लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला.

भात लागवड कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचीक, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पाठारे, कृषी विकास अधिकारी महेश नारायणकर, जिल्हा कृषी अधिकारी निकिता सुर्यवंशी, अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्यासह अलिबाग व मुरुड पंचायत समितीमधील अधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी स्वतः शेतामध्ये उतरून भात लावणीचा आनंद लुटला.

Exit mobile version