जिल्हा परिषद प्रशासनाची हालचाल सुरु; वैद्यकिय तपासणीसह कागदपत्रे पडताळणीनंतर होणार निवड
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा असल्याने शिक्षणावर त्याचा परिणाम होत असल्याची ओरड कायमच आहे. मात्र आता ही ओरड थांबणार आहे. पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे जिल्ह्यासाठी 237 शिक्षक देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना आता नवीन शिक्षक मिळणार आहेत. वैद्यकिय तपासणीनंतर कागदपत्रे पडताळणीनंतर त्यांची वेगवेगळ्या शाळांमध्ये निवड केली जाणार आहे.
रायगड जिल्हयातील ग्रामीण भागात सुमारे दोन हजार गावे, वाड्या आहेत. ग्रामीण भागाची लोकसंख्या सुमारे 16 लाख 64 हजार इतकी आहे. जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन हजार 528 शाळा असून 91 हजार 343 अधिक विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम पाच हजार 890 शिक्षक करीत आहेत. त्यात 45 हजार 270 विद्यार्थी व 46 हजार 73 विद्यार्थीनींचा समावेश आहे.
जिल्ह्यात सूमारे एक हजारहून अधिक शिक्षक कमी आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने कंत्राटी स्वरूपात सेवानिवृत्त शिक्षकांची निवड केली होती.मात्र एप्रिलपासून या शिक्षकांना पुन्हा कामावरून काढण्यात आले. त्यामुळे शिक्षकांच्या कमतरतेचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होण्याची भिती निर्माण झाली होती. परंतु पवित्र पोर्टलद्वारे नियमीत शिक्षकांची भरती करण्यात आली. केली. जिल्ह्यासाठी दोनशे 237 शिक्षक देण्यात आले. रायगड जिल्हा परिषद प्रशासनाकडून शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर समुपदेशन करून या शिक्षकांची नेमणूक जिल्ह्यातील शाळांवर केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळांना आता नवीन शिक्षक मिळणार आहेत. ज्या शाळांमध्ये पटसंख्या असूनदेखील शिक्षकांची कमतरता जाणवत आहे. त्या शाळांमध्ये आता शिक्षक येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिक्षण विभाग काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी 237 शिक्षकांची निवड केली आहे. कागदपत्रे पडताळणी पुढील आठवड्यात केली जाणार आहे. त्यानंतर समुपदेशन करून त्यांना शाळा दिल्या जाणार आहेत.
पुनिता गुरव – शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग