मनोरंजनातून सर्वांगीण विकासाला चालना
| पाली/बेणसे | वार्ताहर |
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणातही नवनवीन क्रांती घडत आहे. याच क्रांतीचा एक भाग म्हणून रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कांटीचे प्राथमिक शिक्षक शरद घुले यांनी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अभिनव आणि अत्यंत उपयुक्त शैक्षणिक ॲप विकसित केले आहेत. रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांच्या हस्ते शरद घुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद शाळांतील बहुतांश शिक्षक प्रयोगशील व नवोपक्रमशील आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ते नवनवीन शैक्षणिक साधणतंत्र व उपक्रम बनवतांना दिसतात. शरद घुले यांनी विकसित केलेल्या ॲपमध्ये अनेक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत, जी त्यांना इतर पारंपरिक शैक्षणिक साधनांपेक्षा वेगळे ठरवतात. शिक्षण मनोरंजक व आनंददायी करणारे हे ॲ मुलांच्या व पालकांच्या पसंतीस उतरत आहे. ग्रामीण व शहरी भागातील मुलांच्या अध्ययनासाठी ते उपयुक्त व प्रभावी आहे. हे ॲप विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणारे माध्यम ठरत आहे. मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतांचा सखोल विचार करून तयार केलेले हे ॲप शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायक, सुलभ आणि प्रभावी बनवत आहेत. सध्या पहिली, चौथी आणि पाचवी साठीचे ॲप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. तर, दुसरी आणि तीसरीचे ॲप चाचणी टप्प्यात आहेत.
ॲपची वैशिष्ट्ये
या ॲपचा वापर अत्यंत सोपा असून, लहान मुलेही ती सहजपणे हाताळू शकतात. इंटरफेस अत्यंत यूजर-फ्रेंडली असल्याने पालकांनाही मुलांना ॲप्स वापरण्यासाठी मदत करावी लागत नाही. प्रत्येक वेळी ॲप उघडल्यावर किंवा नवीन सराव करताना विद्यार्थ्यांना नवीन प्रश्न मिळतो. त्यामुळे घोकंपट्टी न होता, मुलांना संकल्पना समजून घेण्यास मदत होते. पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठीचे शिष्यवृत्ती ॲप हे विशेषत्वाने उल्लेखनीय आहे.
एका जिल्हा परिषद शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. हे ॲप केवळ अभ्यासक्रमाचे साधन नसून, मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे, त्यांना भविष्यासाठी तयार करणारे आणि शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारे साधने आहे. घुले यांच्या या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना आधुनिक आणि प्रभावी शिक्षण उपलब्ध होईल, अशी आशा आहे.
मोहन भोईर,
मुख्याध्यापक, राजिप शाळा गंगेचीवाडी-पेण







