पावसाळ्यात बालकांच्या आरोग्याकडे जि.प.चे लक्ष

महिला व बालविकास विभागाचा सीईओंकडून आढावा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांच्या मान्सून पूर्व आढावा बैठकीचे बुधवारी (दि.8) जिल्हा परिषदेत करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महिला व बालविकास विभागाच्या कार्याचा आढावा घेतला व योग्य त्या उपाययोजना सुचविल्या.

एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत 6 वर्षाआतील मुलांच्या पोषण व आरोग्य स्थितीत सुधारणा करणे तसेच बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे उद्देशाने पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, लसीकरण, शालेय पूर्व शिक्षण व महिलांना आरोग्य व पोषण शिक्षण इत्यादी सेवा देण्यात येतात, यासह अंगणवाड्या इमारतींची सुरू असलेली कामे तसेच इतर कामांचा आढावा डॉ. किरण पाटील यांनी घेत, आवश्यक त्या सूचना केल्या. पावसाळयाच्या कालावधीमध्ये अंगणवाडी लाभधारकांना पूरक पोषण आहारामध्ये खंड पडणार नाही व कुपोषणाच्या प्रमाणात वाढ होणार नाही याबाबतची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना डॉ. किरण पाटील यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांना केल्या.

यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, स्वदेश फाऊंडेशन संस्थेचे तुषार इनामदार उपस्थित होते. आढावा बैठकीचे सूत्रसंचालन नेहा थळे यांनी केले. यावेळी उत्कृष्ट करू करणार्‍या संस्था तसेच महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्पांचा सत्कार करण्यात आला.

Exit mobile version