कार्यकर्त्यांचा हिंसाचार; पोलिसांचे पेटवले वाहन
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
प्रियंका गांधींनंतर आता अखिलेश यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी अनावर होत पोलिसांचे वाहन पेटवून दिले. लखीमपूर खेरीच्या घटनेमुळे उत्तर प्रदेमध्ये आंदोलनांनी वेग पकडला आहे. लखीमपूर खेरीच्या शेतकर्यांना भेटण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील शेतकर्यांची भेट घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर पोलिसांनी त्यांना स्थानबद्द करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अखिलेश यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
अखिलेश यांना रोखण्यात आल्यानंतर त्यांनी घराबाहेर धरणे आंदोलन सुरु केले. त्यानंतर पोलिसांनी अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले. शेकडो समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापटी झाल्या. यानंतर अखिलेश यादव यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांच्या वाहनाला आग लावण्याची घटना घडली. ही घटना घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर घडली, जिथे अखिलेश यादव त्याच्या निवासस्थानाजवळ आंदोलनासाठी बसले होते.
- हे सरकार शेतकर्यांवर ज्या प्रकारचे अत्याचार करत आहे, तसे अत्याचार इंग्रजांनी सुद्धा केले नाहीत. गृह राज्यमंत्री अजय मिश्रा आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा. तसेच मरण पावलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबियांना दोन कोटी रुपये आणि सरकारी नोकर्या दिल्या पाहिजेत, असे सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.