‘परख’मधून विद्यार्थ्यांची ‘पारख’; रायगडात 3765 परीक्षार्थी
। रायगड । सुयोग आंग्रे ।
शिक्षण मंत्रालयांतर्गत चालवल्या जाणार्या एनसीईआरटीच्या माध्यमातून इयत्ता तिसरी, सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांची परख चाचणी बुधवारी (दि.4) घेण्यात आली. देशभरात एकाच वेळी ही चाचणी घेऊन विद्यार्थ्यांची ‘पारख’ करण्यात आली. देशातील लाखो विद्यार्थ्यांनी ही चाचणी परीक्षा दिली. त्या चाचणीसाठी रायगड जिल्ह्यातील 137 शाळांमधील 3765 विद्यार्थ्यांची चार प्रादेशिक भाषांतून परीक्षा घेण्यात आली. यासाठी 190 क्षेत्रीय अन्वेषकांची नियुक्ती करण्यात आली होती.
इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत शिकवलेल्या अध्यापनाचे किती आकलन झाले आहे, याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी दर तीन वर्षांनी एनसीईआरटीच्या माध्यमातून जिल्हास्तरावर ही परीक्षा घेतली जाते. यंदा या परीक्षेत बदल करून तिसरी इयत्तेबरोबरच सहावी आणि नववीच्या वर्गाचादेखील समावेश करण्यात आला होता. या विद्यार्थ्यांची ही पहिलीच परीक्षा होती. या परीक्षेसाठी विद्यार्थी, परीक्षा केंद्र व शाळांची निवड करण्याचे नियोजन जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभागातर्फे करण्यात आले होते.
परख राष्ट्रीय सर्वेक्षण परीक्षा यादृच्छिक पद्धतीने होणार आहे. यामध्ये सर्व माध्याम व सर्व व्यवस्थापनाच्या निवडक शाळांमधील इ. 3 री, 6 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, व सामाजिक शास्त्र या विषयांमधील संपादणूक पडताळणी करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील इ. 3 रीच्या 43 शाळांमधील 1137, इ. 6 वीच्या 43 शाळांमधील 1148 विद्यार्थ्यांचे व इ. 9 वीच्या 51 शाळांमधील 1480 विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार आहे. या शाळांची निवड ही एनसीईआरटीच्या वतीने यूडायसच्या आधारे केली करण्यात आली. निवडलेल्या प्रत्येक एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. यंदा घेण्यात आलेली परीक्षा ही नवीन बदलानुसार घेण्यात आली.
रायगड जिल्ह्यात उर्दू, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या विषयांतून विद्यार्थ्यांची परख चाचणी घेण्यात आली. इयत्ता तिसरीसाठी 45 गुणांची परीक्षा घेण्यात आली. यासाठी 60 मिनिटांचा वेळ विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. इयत्ता सहावीसाठी 51 गुणांची परीक्षा घेण्यात आली. यासाठी 60 मिनिटांचा वेळ देण्यात आला. इयत्ता नववीची 60 गुणांची परख चाचणी घेण्यात आली. यासाठी 120 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता, अशी माहिती डायटचे रामदास टोणे यांनी दिली. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाऐवजी आता समग्र प्रगती मूल्यमापन पद्धती असणार आहे. या चाचणीनंतर वर्ग तिसरी, सहावी व नववीच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले जाणार आहेत. या परीक्षेत असलेल्या प्रश्नांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित घटकांचा समावेश करून अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे.