फुलांची उधळण, औक्षण, गुलाब पुष्प देऊन नवोगतांचे स्वागत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
दीड महिन्याच्या सुट्टीनंतर जिल्ह्यातील शाळा सोमवारी (दि.15) सुरु झाल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांसह अन्य शाळांमध्ये फुलांची उधळण, औक्षण करीत आणि गुलाब पुष्प देऊन नवोगतांचे स्वागत करत प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यामुळे आता जिल्ह्यातील शाळांमधील मुला, मुलींचा किलबिलाट पुन्हा सुरु झाल्याचे चित्र दिसून आले. तसेच, जिल्हा परिषद शाळेबद्दल आकर्षण निर्माण व्हावे, म्हणून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच खाऊ देण्यात आला.
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परिक्षा संपल्यानंतर दि.14 जूनपर्यंत दीड महिना उन्हाळी सुट्टी जाहीर झाली होती. काही विद्यार्थ्यांनी सुट्टीचा आनंद खेळून व पालकांसमवेत ठिकठिकाणी फिरून घालविला. त्यानंतर शाळा कधी सुरु होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर ही उत्कंठा संपली आणि सोमवारपासून शाळा नव्याने सुरु झाल्या. यावेळी ज्ञान मंदिरांची कवाडे उघडण्यात आली.
नव्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आवड निर्माण व्हावी, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत शाळा पुर्व तयारी नियोजन करण्यात आले होते. यावेळी नव्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या दरम्यान, संपुर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थपन समितीचे पदाधिकारी, सभासद, पालक, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. या प्रभात फेरीतून शाळेचे महत्व गावांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रभात फेरी झाल्यावर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे फुलांचा वर्षाव व औक्षण करीत स्वागत करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना गोड पदार्थ देण्यात आले. त्यानंतर शाळेत प्रार्थना घेण्यात आली. तसेच, शासनाकडून देण्यात आलेल्या पुस्तकांचे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी वाटप करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधण्यात आला. तर, काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी अशाप्रकारे वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस एक वेगळ्या उपक्रमातून पार पडला.










