| माणगाव | प्रतिनिधी |
दक्षिण रायगडमधील हजारो सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र असलेल्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव, उपलब्ध अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्रीचा अपुरा वापर आणि गंभीर रुग्णांना उपचारासाठी अलिबाग अथवा मुंबईकडे पाठविण्याची वेळ यामुळे रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे ही पदे तातडीने भरावीत व नागरिक रुग्णांची गैरसोय टाळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष संताजी पवार यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहे.
माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे सुमारे 100 खाटांची क्षमता असलेले महत्त्वाचे शासकीय रुग्णालय असून माणगावसह तळा, श्रीवर्धन, म्हसळा तसेच परिसरातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक उपचारासाठी या रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी संताजी पवार यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले. यंत्रसामग्री उपलब्ध, मात्र तज्ज्ञ मनुष्यबळाचा अभाव शासनाने जनतेच्या पैशातून रुग्णालयात विविध अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. मात्र, ही उपकरणे चालविण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञ आणि प्रशिक्षित कर्मचारी पुरेशा संख्येने उपलब्ध नसतील, तर कोट्यवधी रुपयांच्या सुविधांचा सर्वसामान्य रुग्णांना प्रत्यक्ष लाभ कसा मिळणार, असा सवाल संताजी पवार यांनी उपस्थित केला. तसेच आपत्कालीन परिस्थितीत अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांना 24 तास तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी आणि या सर्व मागण्यांवर आरोग्य प्रशासनाने कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करून त्याबाबत लेखी माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून तातडीने सुधारणा करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष जनतेला सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष कांबळे, रायगड जिल्हा ओबीसी सेल अध्यक्षा अश्विनी ठाकूर, अलिबाग विधानसभा सरचिटणीस साईनाथ म्हात्रे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






