89 लाख 58 हजार 145 रुपयांचा साठा जप्त
| रायगड | प्रमोद जाधव |
प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर रायगडच्या अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात तब्बल 39 ठिकाणी छापे टाकून 89 लाख 58 हजार 145 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, 19 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भेसळखोर आणि नियमबाह्य अन्नपदार्थ विक्रेत्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
रायगड जिल्ह्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थांसह लाडू, चिवडा, मिठाई, खवा, पनीर आणि रेडीमेड अन्नपदार्थांची मागणी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिक आणि भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम तीव्र केली आहे.
भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येत असून, दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी विशेष कारवाई केली जात आहे. सहाय्यक आयुक्त मिलींद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबागसह जिल्ह्यातील विविध भागांत पथकांकडून कारवाईचे सत्र सुरू आहे.
प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांसह कंपन्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 89 लाख 58 हजार 145 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 19 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दरम्यान, जिल्ह्यात 310 अन्न नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 107 नमुने प्रमाणित, तर 8 नमुने अप्रमाणित व असुरक्षित असल्याचे समोर आले. त्यानुसार अप्रमाणित व असुरक्षित पदार्थ ठेवणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
अन्नपदार्थांबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 129 जणांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर 8 व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसह दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाई, मावा उत्पादक आस्थापनांची तपासणी करण्यात येत आहे. हॉटेल, रेस्टॉरंटबाबतही तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात अन्नपदार्थांमध्ये भेसळ अथवा अन्य नियमबाह्य प्रकार होत असल्यास नागरिकांनी संपर्क साधावा.
– मिलींद महांगडे, सहाय्यक आयुक्त,
अन्न व औषध विभाग, रायगड





