चौकच्या कर्मचाऱ्याच्या भरवशावर पोस्टमार्टम
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या आठ महिन्यांपासून शवविच्छेदनासाठी कर्मचारीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. संबंधित कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त पद भरण्याची तसदी आरोग्य विभागाने घेतलेली नाही. त्यामुळे पोस्टमार्टमची प्रक्रिया चौक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याच्या भरवशावर सुरू आहे. आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभाराचा फटका मृतांच्या नातेवाईकांना बसत आहे.
खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नवीन नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे तालुक्यात दुर्घटना किंवा अनैसर्गिक मृत्यूची घटना घडल्यास चौक येथील कर्मचाऱ्याला बोलवावे लागते. परिणामी, शवविच्छेदन प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता असून, दुःखात असलेल्या कुटुंबियांना आणखी प्रतीक्षा करावी लागते.
खालापूर तालुका भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असताना आरोग्य यंत्रण्ोतील मनुष्यबळाची कमतरता अधिकच गंभीर ठरत आहे. चौक येथील कर्मचाऱ्याला स्वतःच्या केंद्राची जबाबदारी सांभाळून खालापूरची अतिरिक्त जबाबदारीही पार पाडावी लागत आहे. आठ महिने उलटूनही रिक्त पद न भरण्यामागचे कारण काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
चौकच्या कर्मचाऱ्यावर किती दिवस भार?
एका आरोग्य केंद्रातील महत्त्वाची सेवा दुसऱ्या केंद्रातील कर्मचाऱ्याच्या उपलब्धतेवर अवलंबून राहणे ही आरोग्य विभागाच्या नियोजनाची शोकांतिका आहे. शवविच्छेदनासारख्या संवेदनशील प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी कर्मचारी नसणे गंभीर बाब आहे. खालापूरचे रिक्त पद तातडीने भरावे आणि चौकच्या कर्मचाऱ्यावरील अतिरिक्त भार कमी करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






