स्वस्त रोप-वे उभारण्यासाठी संभाजीराजेंचा पुढाकार
| महाड | प्रतिनिधी |
सध्याच्या रोप-वेचे दर सर्वसामान्य शिवभक्तांना परवडत नसताना आता अवघ्या 100 ते 150 रुपयांत रायगडावर जाऊन पुन्हा खाली येण्याची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यासाठी स्वस्त आणि अद्ययावत रोप-वे उभारण्याचा प्रस्ताव रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी पुढे आणला आहे. शिवभक्तांच्या भेटीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.
रायगड किल्ल्याचे संवर्धन आणि जतन शास्त्रोक्त पद्धतीने सुरू आहे. मात्र, सध्याच्या रोप-वेवरील वाढता ताण आणि सर्वसामान्यांना न परवडणारे दर लक्षात घेऊन नव्या रोप-वेचा विचार सुरू आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिवभक्तांनाही दुर्गराज रायगडाचे दर्शन घेणे शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळे रायगडाच्या पंचक्रोशीतील 21 गावांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याचीही अपेक्षा आहे. या रोप-वेच्या मंजुरीसाठी गेल्या चार ते पाच वर्षांपासून दिल्लीतील पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. मात्र, पुरातत्त्व विभागाची मंजुरी कधी मिळणार आणि स्वस्त रोप-वेचे स्वप्न प्रत्यक्षात कधी उतरणार, याकडे शिवभक्तांचे लक्ष लागले आहे.






