विदेशी महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील सारळ येथील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये रविवारी (दि.14) पहाटे छापा टाकण्यात आला. या छाप्यात काही व्यक्ती पार्टी करीत होते. तर, काहीजण गांजाचे सेवन करीत असल्याचे आढळून आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मांडवा सागरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली असून, विदेशी महिलेसह मुंबई व सारळ येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सारळ येथील इनर सर्कल सोसायटीतील खोलीमध्ये काही गैरप्रकार चालत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, सहाय्यक फौजदार किशोर पाटील, पोलीस हवालदार चेतन म्हात्रे, अक्षय पाटील, पोलीस शिपाई अनिकेत म्हात्रे तसेच मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहाय्यक फौजदार प्रसन्न जोशी, पोलीस हवालदार विनोद पाटील रंजीत खराले, कौस्तूभ मगर, अमोल हंबीर, महिला पोलीस हवालदार झुलिता भोईर या पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी दोन व्यक्ती कागदी नळीमध्ये भरलेला गांजा पेटवून त्याचा धुर ओढत असल्याचे दिसून आले. त्यांची झडती घेतली असता कागदी नळ्या, अर्धवट जळालेली गांजाने भरलेली कागदी नळी, लायटर, तीन ग्रॅम वजनाचा गांजा इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईच्यावेळी विदेशी महिला दिसून आली. युक्रेन देशाची ती महिला असून तिच्या कागदपत्रांची तपासणी केली असता तिचा व्हीसा दि.1 जून रोजीला संपला असल्याचे निदर्शनास आले. भारतात वास्तव्याबाबत त्या महिलेकडे कोणतेही ठोस पुरावे दिसून आले नाही.
यावेळी विदेशी महिलेसह सारळ येथील सुनिल चावला (69) व मुंबईमधील वरळी येथील हरेंद्र सिंग मंगल सिंग (65) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांडवा बंदर पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठरत आहे. त्यामुळे सारळसह अन्य ठिकाणी जागा घेऊन, घर घेऊन राहत आहेत. मात्र, या शांत असलेल्या परिसरात गांजासह अन्य गैरप्रकारच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे हा गोरखधंदा चालविणाऱ्यांमागे नक्की सुत्रधार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलीस अधीक्षकांकडून आवाहन
अंमली पदार्थ सेवन, विक्री व साठा ठेवणाऱ्यांविरोधात काही माहिती असल्यास तात्काळ पोलीस ठाणे व रायगड पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्यात यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडून करण्यात आले आहे.







