| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे भातपीकाबरोबर नारळ-सुपारीचे पीक देखील महत्त्वाचे उत्पन्नाचे स्त्रोत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची स्वतःची भातशेती नाही. त्यामुळे नारळ सुपारीच्या बागा त्यांच्या उपजिविकेचा एकमात्र स्त्रोत आहेत. परंतु, सद्यस्थितीत या पिकाला काही प्रमाणात अस्मानी व सुलतानी संकटांनी ग्रासले आहे. सुपारीच्या फळांसह झाडांवर पडत असलेल्या विविध रोगांमुळे सुपारीचे पीक संकटात सापडले आहे.
सध्याच्या वातावरणातील बदलामुळे वाढलेली उष्णता सुपारीच्या छोट्या रोपांना त्रासदायक ठरत आहे. या उष्णतेमुळे रोपांवर करपा रोग पडण्यास सुरुवात झाली आहे. रोपांची वाढ खुंटून ते उभेच सुकते. या एका नव्या रोगाने सुपारीवर नवीन संक्रांत आली आहे. याशिवाय मुंग्या, उंदीर, खारी, भुंगे, वटवाघळे इत्यादी सुपारीच्या फळांना व्यवस्थित वाढून देत नाहीत. मुरुड तालुक्यात जवळपास 416 हेक्टर जमीनीवर सुपारीची लागवड करण्यात येते. परंतु, काही वर्षांपासून सुरू असलेल्या निसर्ग व अन्य वादळाच्या घटनांमुळे त्यातील 142 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यातच आता सुपारीच्या झाडांना विविध रोगांनी ग्रासले आहे.
सुपारीच्या झाडांना भेडसावणाऱ्या रोगात झाडाच्या बुडाशी आळंबी नावाचा रोग होतो. या रोगाच्या आळ्या झाडाच्या बुंध्याला पोखरतात व रस शोषण करतात. परिणामी लहान मोठी झाडे उभीच वाळून जातात. तसेच, ज्या बागांमध्ये पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साठते तेथे आळंबी रोग मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याचबरोबर बागेत पाणी साठणे व जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत पडणाऱ्या संततधार पावसातील दमट हवामानात कोवळ्या सुपारी फळांना कोळे रोगाची लागण होते. या रोगाने मोठ्या फळांना बुरशी पकडून त्यांची गळती सुरू होते व महिनाभरात हा रोग बागायतीत सर्व झाडांच्या फळांवर पसरतो. त्यामुळे बागायतदाराचे मोठे नुकसान होते. तसेच, सुपारीच्या झाडांना बांड येणे हा एक रोग ग्रासून टाकतो. या रोगात सुपारीच्या झाडांचे शेंडे आवळत जाऊन बारीक होतात.अशा झाडांना फलधारणा होत नाही. काही काळातच झाड मरून जाते. या खेरीज सुपारीची फळे आकारास येत असतांना काही फळांच्या आतील रोठा वाजवीपेक्षा मोठा होत जातो. त्यामुळे फळांच्या बुंध्याकडील भागाला चिरे पडतात. त्यातून आत पाणी झिरपल्याने कोवळ्या रोठ्यावर कीड पडते व तो खराब होतो. काही दिवसांतच सर्व फळे खराब होऊन गळून पडतात.
या रोगांचे संशोधन व त्यावरील उपाय अगदी दापोलीच्या कृषी विद्यापीठालाही शोधता आलेले नाहीत. खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन-दिवेआगर परिसरात सुपारी संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते; परंतु, ते अद्याप आकारात आलेले नाही. अशा विविध अस्मानी व सुलतानी संकटांनी मुरूडमधील सुपारी अक्षरशः अडकित्त्यात सापडली आहे. त्यात गोरगरीब बागायतदार भरडून निघत आहे. वाढत्या तापमानात झाडांना लागलेली छोटी फळे कशी वाचवावीत, असा प्रश्न त्यांना पडला आहे.






