अखेर गोगावलेंचा दावा खरा ठरला; रायगडच्या पालकमंत्रिपदावर भरत गोगावले
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला असून, मंत्री भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाबाबत सातत्याने व्यक्त केलेला गोगावलेंचा दावा अखेर खरा ठरला आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले हे दोघेही या पदासाठी इच्छुक असल्याने नियुक्तीचा निर्णय लांबणीवर पडला होता. अखेर शासनाने गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गोगावले यांनी यापूर्वी अनेकदा ‘मीच रायगडचा पालकमंत्री होणार’ असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. निर्णय प्रलंबित असतानाही त्यांनी आपल्या दाव्यावर ठाम राहत राजकीय चर्चेला उधाण आणले होते. अखेर शासनाच्या अधिकृत निर्णयानंतर त्यांच्या दाव्यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढाही सुटला असून गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच, स्थानिक राजकीय समीकरणे आणि निधीच्या नियंत्रणावरून सुरू असलेली चर्चा यामुळे या नियुक्तीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर आदेश आला आणि गोगावलेंचा दावा खरा ठरला. ‘मीच पालकमंत्री होणार’ म्हणणारे गोगावले अखेर अधिकृतपणे पालकमंत्री झाले. आता उत्सुकता आहे ती पुढची…रायगडच्या विकासाच्या फाईली किती वेगाने हलणार आणि पालकमंत्रिपदाच्या माध्यमातून जिल्ह्याला काय मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
'मीच'चा एकपात्री प्रयोग अखेर यशस्वी ठरला!
गोगावलेंच्या वारंवारच्या दाव्यांमुळे पालकमंत्रिपदाचा निर्णय होण्यापूर्वीच त्यांचे नाव चर्चेत राहिले. त्यामुळे आता अधिकृत नियुक्तीनंतर समर्थकांकडून 'आम्ही आधीच सांगितलं होतं' असा सूर उमटला. आता आदेशच हातात आल्याने समर्थकांना साहजिकच 'साहेबांनी आधीच सांगितलं होतं!' म्हणण्याची संधी मिळाली. मात्र, एकपात्री प्रयोग यशस्वी झाला… आता रायगडच्या विकासाच्या नाटकात गोगावले संपूर्ण टीमसोबत मुख्य भूमिका कशी निभावतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.






