चार महिन्यांनंतर 1 ऑक्टोबरपासून प्रवासी बोटी धावणार
| चिरनेर | प्रतिनिधी |
पावसाळी हंगामामुळे मागील चार महिन्यांपासून बंद असलेली भाऊचा धक्का-रेवस सागरी मार्गावरील प्रवासी बोट वाहतूक सेवा अखेर 1 ऑक्टोबरपासून पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. या जलवाहतूक सेवेमुळे अलिबाग तसेच कोकणात ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय दूर होणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी 26 मेपासून भाऊचा धक्का-रेवस, मोरा-भाऊचा धक्का तसेच गेटवे मुंबई-मांडवा या सागरी मार्गांवरील प्रवासी वाहतूक खबरदारी म्हणून बंद केली जाते. सप्टेंबरपासून ही सेवा टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येते. मोरा-भाऊचा धक्का आणि गेटवे मुंबई-मांडवा मार्गावरील वाहतूक यापूर्वीच सुरू झाली आहे. मात्र, सतत बदलणाऱ्या हवामानामुळे भाऊचा धक्का-रेवस मार्गावरील प्रवासी बोट सेवा सुरू करण्यात आली नव्हती.
आता सागरी वाहतुकीसाठी वातावरण अनुकूल झाल्याने ही सेवा 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावरील प्रवासाचे तिकीट 100 रुपये आहे. भाऊचा धक्का येथून सकाळी 6.30 वाजता पहिली बोट सुटणार असून, त्यानंतर 8, 10, 12, दुपारी 4 आणि 5 वाजता बोटी सुटणार आहेत. मात्र, हवामानातील बदल किंवा समुद्र खवळल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने वेळापत्रकात बदल करण्यात येऊ शकतो, अशी माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली. चार महिन्यांनंतर सुरू होणाऱ्या या जलवाहतुकीमुळे अलिबागसह कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.






