शेकापसह सर्वपक्षीय मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद; धारावीकरांचे धारावीतच पुनर्वसन करण्याची मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
धारावीकरांच्या हक्कांसाठी शनिवारी शेतकरी कामगार पक्षासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष रस्त्यावर उतरले होते. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात आणि रहिवाशांचे धारावीतच पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी शनिवारी काढण्यात आलेल्या धडक मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुंभारवाडा येथून संविधान चौकमार्गे धारावी एक्स्पेरियन्स सेंटरपर्यंत काढलेल्या या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि धारावीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या मोर्चात शेकापचे मुंबई कार्यालयीन चिटणीस राजेंद्र कोरडे, विद्यार्थी संघटनेच्या ॲड. साम्या कोरडे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. धारावीतील घरे, दुकाने, कारखाने आणि धार्मिक स्थळांसह सर्व बांधकामे पात्र ठरवून संबंधितांचे धारावीतच पुनर्वसन करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. झोपडपट्टीधारकांना 500 चौरस फुटांची, तर पक्क्या इमारतीतील रहिवाशांना 750 चौरस फुटांची घरे मोफत द्यावीत, धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन तातडीने जाहीर करावा, तसेच गुंडगिरी, दहशत आणि पैशाच्या जोरावर रहिवाशांवर दबाव टाकणे बंद करावे, अशा मागण्या आयोजकांनी मांडल्या. धारावीचा विकास झाला पाहिजे; मात्र धारावी धारावीकरांचीच राहिली पाहिजे, अशी ठाम भूमिका सर्वपक्षीय सभेत घेण्यात आली.






