घरबसल्या एका क्लिकवर कागदपत्रे अपलोड; रायगडमध्ये नव्या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी समितीच्या कार्यालयात कागदपत्रे जमा करण्याची धावपळ आता थांबणार आहे. सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला असून, रायगड जिल्ह्यातही या नव्या प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अर्जदारांना घरबसल्या एका क्लिकवर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करता येणार असून, अर्जाची स्थितीही ऑनलाइन तपासता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरी करणारे कर्मचारी आणि राजकीय क्षेत्रातील अर्जदारांना कार्यालयीन फेऱ्या, रांगा आणि वेळेचा अपव्यय टाळता येणार आहे.
जात पडताळणीचे कामकाज यापूर्वी अंशतः ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने सुरू होते. मात्र, आता हे कामकाज पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने परिपत्रक जारी केले आहे. विद्यार्थ्यांसह नागरिकांना सुलभ, गतिमान, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. नागरिकाभिमुख प्रशासन, प्रक्रियेचे सुलभीकरण, वेळेची बचत आणि सेवा वितरणातील पारदर्शकता वाढविण्याच्या उद्देशाने जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि आधुनिक करण्यासाठी डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या सहकार्याने आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्या तांत्रिक सहकार्याने जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सादर करता येणार आहेत. अर्जाची सद्यःस्थिती तपासणे, अर्जदारांच्या माहितीची पुनरावृत्ती टाळणे आणि आवश्यकतेनुसार सुनावणीची प्रक्रिया व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पाडण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित सुविधा आणि चॅटबॉटच्या माध्यमातून अर्जदारांना मार्गदर्शन व त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात येणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र ई-मेल आणि व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
यापूर्वी ऑनलाइन अर्ज केल्यानंतरही आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जावे लागत होते. सुनावणीसाठीही प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता भासत होती. नव्या डिजिटल प्रणालीमुळे या प्रक्रियेतील अनेक अडचणी दूर होणार आहेत. रायगड जिल्ह्यात अनुसूचित जाती, ओबीसी आणि इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती तसेच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरबसल्या जात पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. कागदपत्रे जमा करण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास, प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचणार असल्याने हजारो अर्जदारांना या डिजिटल सुविधेचा लाभ मिळणार आहे.






