उन्नती हॉस्पिटल आणि टीम चित्रलेखा पाटील यांचा संयुक्त उपक्रम; निलेश खोत यांचा पुढाकार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी आणि आर्थिक अडचणींमुळे कोणालाही उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने थेरोंडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उन्नती हॉस्पिटल अँड आयसीयू, पनवेल आणि टीम चित्रलेखा पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेंतर्गत शनिवारी (दि.28) श्री खंडोबा दरबार, खंडेराव पाडा येथे हे शिबीर उत्साहात पार पडले. रेवदंडा शहर चिटणीस तथा शेकापचे निलेश खोत यांच्या पुढाकाराने आणि टीम चित्रलेखा पाटीलचे अध्यक्ष विक्रांत वार्डे यांच्या समन्वयातून आयोजित या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन रेवदंडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेश खोत, शरद वरसोलकर, मुजफ्फर मुकादम, रेवदंडा शहर चिटणीस निलेश खोत, रेवदंडा ग्रामपंचायत उपसरपंच संतोष मोरे (बाबू मोरे) व पाचगाव पाटील शरद खंडेराव, शरद खंडेराव, पाचगाव पाटील, गोरक्षनाथ नवरीकर, सनथकुमार सुडकू, महेश सुडकू, दिनेश सुडकू, मनोज जंगली, संतोष टीवळेकर, विश्वास टीवळेकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. टीम चित्रलेखा पाटीलचे सदस्य अमोल मिठाग्री आणि निशिकांत कोळसे यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
शिबिरामध्ये नागरिकांची विविध आजारांसाठी प्राथमिक तपासणी करण्यात आली. रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाब तपासण्यासह आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचाराची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय विविध आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ कसा घेता येईल, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. शासनाच्या आरोग्यविषयक योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना दर्जेदार उपचार मिळवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी निलेश खोत, विक्रांत वार्डे, शरद खंडेराव, प्रतीक पानकर, श्रीकांत किल्लेकर, निखिल सुडकू, माजी ग्राम पंचायत सदस्य अशोक नाईक तसेच टीम चित्रलेखा पाटीलचे अमोल मिठाग्री, निशिकांत कोळसे, डॉ. संदेश सानप यांनी परिश्रम घेतले.






