चिंचोटी येथील 42 वर्षीय इसमाचा अपघाती मृत्यू; जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा मार्गावरील आंबेपूरजवळ चिंचोटी येथे शनिवारी (दि.28) झालेल्या अपघातात एका 42 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने अलिबागकडे जाणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील सरकारी रुग्णवाहिकेने धडक दिल्याने या इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, ही रुग्णवाहिका रस्त्यावर चालवण्याच्या क्षमतेची नसल्याची म्हणजेच या सरकारी रुग्णवाहिकेचं फिटनेस सर्टीफिकेट नऊ महिन्यापूर्वी संपलेला असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यावेळी काही वेळ रुग्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अलिबाग, रेवदंडा पोलिसांसह महाराष्ट्र सुरक्षा दल, होमगार्ड जवानांचा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत उर्फ बबन पाटील असे या मृत व्यक्तीचे नाव असून हा इसम अलिबाग तालुक्यातील चिंचोटी येथील रहिवासी होता. शनिवारी दुपारी त्यांच्या दुचाकीवरून जात असताना रोहाकडून अलिबागकडे जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेची त्यांना जोरदार धडक लागली. या धडकेत ते खाली पडले. त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारसाठी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हेमंत पाटील यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक आणि चिंचोटी गावातील ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालय गाठले. बबन पाटील यांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र या रुग्णवाहिकेचं फिटनेस सर्टीफिकेट नऊ महिन्यापूर्वी संपलेला असतानाही ही रुग्णवाहिका रस्त्यावर का पाठविण्यात आली? असा सवाल करत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तसेच, या प्रकरणातील संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका हेमंत पाटील यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
रुग्ण प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर
अलिबागमधील जिल्हा रुग्णालयातील सरकारी रुग्णवाहिका भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारा कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वच्या अंतर्गत देण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयाच्या नावाने आहे. ही रुग्णवाहिका एमएच 06 सीपी. 0121 या क्रमांकाची आहे. ही रुग्णवाहिका 25 ऑक्टोबर 2023 मध्ये खरेदी केली असून नोंदणी 27 मार्च 2024 मध्ये करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेची फिटनेस मुदत 18 मार्च 2026 पर्यंत होती. रस्त्यावर चालण्यायोग्य क्षमतेची मुदत नऊ महिन्यापूर्वी संपलेली होती. तरीदेखील ही रुग्णवाहिका शासनाचे सर्वच नियम मोडून रस्त्यावर धावत होती. त्यामुळे रुग्ण प्रशासनाच्या गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे रुग्णालयातील सर्व रुग्णवाहिकांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.






