| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
कोकणात पर्यटनाचा ओघ वाढत असून, वर्षभर लाखो पर्यटक फिरायला येत असतात. आगामी काळात रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे तिन जिल्हे जलमार्गाने जोडले गेल्यावर कोकणासह मुरूडमध्ये पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यत आहे. येथील जंजिरा किल्ला हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण असल्याने मुंबईकडून येणारा पर्यटक पहिले येथे थांबूनच पुढचा प्रवास करतील. तसेच, याठिकाणी पर्यटकांसाठी नूतन जेटी झाली असल्याने पर्यटकांचा प्रवास व जेट्टीवर चढणे उत्तराने सुखकर झाले आहे. परंतु, या जेट्टीवर बोट येईपर्यंत कडक उन्हात उभे राहणे पर्यटकांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे जेट्टीवर पत्र्याची शेड लवकरात लवकर उभारण्याची मागणी होत आहे. तसेच, जंजिरा किल्ला पहाण्यासाठी दरवर्षी 5 लाख पर्यटक येत असतात; परंतु, पद्मदुर्ग किल्ल्यावर अत्याधुनिक सुविधा प्राप्त करून दिल्या तर हीच पर्यटक संख्या निश्चितच 12 लाखावर जाईल. त्यामुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असे स्थानिकांमधून बोलले जात आहे.






