। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
हुल्लडबाजी करणाऱ्या नागरिकांना त्या ठिकाणाहून जाण्यासाठी सांगितले असता एकाने पोलिसांवर दगडाने हल्ला केला आणि इतरांनी शिवीगाळ केली. या प्रकरणी चार जणांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाधववाडीच्या पाठीमागील सिडको मैदानात, नाल्याजवळील वॉकिंग ट्रॅकच्या बाजूला, कळंबोली येथे बुधवारी (दि.25) रात्री साडेदहाच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत होते. यावेळी काही जण घोळक्याने, मोठमोठ्याने आरडा ओरडा करून हुल्लडबाजी करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यावेळी पोलिसांनी त्यांची ओळख सांगून त्यांना त्या ठिकाणाहून निघून जाण्यास सांगितले. यावेळी आदित्य सपकाळ (रा. आनंद रेसिडेन्सी, विहीघर) याने पोलिसांवर दगडाने हल्ला केला आणि संतोष गरजे, सुरज लोंढे आणि अन्य एका इसमाने पोलिसांना शिवीगाळ केली. याप्रकरणी त्या चार जणांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






