द्रोणगिरी परिसरातील बजेट गोदामातील घटना
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्रोणागिरी नोडमधील बजेट गोदामातून 2 कोटी 17 लाख रुपये किमतीचे बदामाचे तीन कंटेनर अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. सूरज सिंह या बनावट नावाने कागदपत्रे तयार करून ही चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
द्रोणागिरी नोडमधील बजेट गोदामात 22 नोव्हेंबर रोजी परदेशातून आयात केलेले बदाम आणि सुपारीचे कंटेनर सुरक्षित ठेवण्यात आले होते. जी.पी. इम्प्रेशन आणि एमएनएन या दोन कंपन्यांच्या नावाने आयात केलेल्या मालापैकी बदामाचे तीन कंटेनर 22 नोव्हेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास बनावट कागदपत्रांच्या आधारे लंपास करण्यात आले. चोरी झालेल्या बदामांची किंमत 2 कोटी 17 लाख रुपये आहे.
चोरीची माहिती मिळताच कंपनी व्यवस्थापनाने उरण पोलिसांना कळविले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज काटवाणी आणि एपीआय वैभव रोंगे तपास करीत आहेत. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके संशयित ठिकाणी रवाना झाली असून, लवकरच आरोपींचा शोध घेतला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.






