| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि.26) ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान दिनाचा शुभारंभ करून भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा. पंकज पांडुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून त्यामध्ये भारतीय संविधानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महत्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. इतिहास विभागाचे प्रा. साईनाथ पाटील यांनी संविधान दिनाचा ऐतिहासिक आढावा घेतला. प्रा. मिलिंद घाडगे यांनीही भारतीय राज्यघटनेवर माहिती सांगितली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय वक्तव्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी भारतीय संविधानावर भाष्य करत असताना भारतीय संविधानाने दिलेले अधिकार हे किती महत्त्वाचे आहेत यावर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. नम्रता पाटील, प्रा. साईनाथ पाटील, प्रा. वृषाली घरत, डॉ.अमृता कुमारी, प्रा. हर्षल काटे, प्रा. संजना पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रतीक्षा कागे, प्रा. सिद्धी पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार इतिहास विभागाची विद्यार्थिनी प्रणाली तळेगावकर हिने केले.






