। पनवेल । प्रतिनिधी ।
कळंबोली ते डी-पॉइंट मार्गावरील करंजाडे पुलावर भरधाव खासगी बसने पुढे चाललेल्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात सहा विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक आणि एक फिर्यादी असे नऊ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.बा. पाटील स्कूल, कामोठे येथील विद्यार्थी राष्ट्रीय विज्ञान बाल परिषद (एनसीएससी)च्या जिल्हा पात्रता फेरीसाठी आले होते. कार्यक्रम आटोपून शाळेत परतत असताना खासगी बस क्रमांक एमएच 46 बीएफ 6440 च्या चालकाने भरधाव वेगात बस चालवून पुढील ट्रेलरला पाठीमागून धडक दिली. या अपघातात सहा विद्यार्थी, दोन शिक्षक आणि फिर्यादी जखमी झाले. याप्रकरणी बसचालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






