धाटाव एमआयडीसी प्रशासनाचा प्रताप
| रोहा/चणेरा | प्रतिनिधी |
निसर्गाच्या असंतुलनाचा फटका अधिकच जाणवत असतानाच आता धाटाव एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा भलताच प्रताप समोर आला आहे. नाले व गटार साफसफाई व दुरुस्तीच्या नावाखाली प्रदूषण विरहीत भलीमोठी करंज जातीच्या अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे वृक्षप्रेमी व कंपनी व्यवस्थापन अधिकाऱ्यांत संतापाची लाट उसळली असून, संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीतील कारखान्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यतः प्रदूषण विरहित करंज झाडांची जागोजागी मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. यासाठी पर्यावरण अभ्यासक पी.पी. बारदेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरआयए प्रशासनाने नेहमीच पुढाकार घेतला. प्रदूषणाला विरोध करण्यात करंज आघाडीवर आहे. हे संशोधनातून सिद्ध झाले. कार्बन डायऑक्साइड, सल्फर हे सगळं करंजाची पाने शोषून घेतात. करंजाची पेंड म्हणजे गांडूळ खतावली ही ख्याती आहे. खराब माती, पाण्यातही डौलदार असतात. परंतु, एमआयडीसीच्या जागेवरील हीच करंजाची झाडे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. नुकतेच येथील ट्रान्सवर्ड कंपनीलगत असलेल्या एमआयडीसीच्या जागेतून नाले व गटार दुरुस्ती आणि साफसफाईचे काम ठेकेदाराला देण्यात आले. परंतु, संबंधित ठेकेदाराने जेसीपीच्या सहाय्याने येथील गटार साफ करत असताना त्याठिकाणी असलेली करंजाची झाडे जमीनदोस्त केली. त्यामुळे लगतचे मैदान बोडकं केल्याने संतापाची लाट उसळली आहे. याबाबत एमआयडीसी प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. याबाबत सहा. अभियंता विनीत कांदळगावकर यांना विचारणा केली असता, नंतर बोलतो असे म्हणत अक्षरशः निरुत्तर झाले. त्यामुळे झाडांची कत्तल केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पर्यावरण प्रेमी राजेंद्र जाधव यांनी केली आहे.






