बेलापूर न्यायालयासह महापालिका मुख्यालयाला उडवून देण्याचा ई-मेल; पोलिसांकडून तपासणी
। कळंबोली । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील महत्त्वाच्या शासकीय आस्थापनांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. बेलापूर येथील न्यायालय आणि नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला बॉम्बस्फोटने उडवून देण्याची धमकी या ई-मेलद्वारे देण्यात आली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना हाती घेतल्या.
धमकीचा ई-मेल प्राप्त होताच प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता दोन्ही इमारतींमधील कामकाज तात्पुरते थांबवले. न्यायालयातील वकील, कर्मचारी आणि नागरिकांसह महापालिका मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून बेलापूर न्यायालय आणि महापालिका मुख्यालय परिसरात कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे. संशयास्पद वस्तू किंवा स्फोटकांचा शोध घेण्यासाठी परिसरातील प्रत्येक भागाची पाहणी केली जात आहे.
हा धमकीचा ई-मेल नेमका कोणी आणि कुठून पाठवला, याचा शोध घेण्यासाठी सायबर सेल आणि पोलीस यंत्रणा तपास करत आहेत. ई-मेलचा स्रोत शोधण्यासह त्यामागील व्यक्तीचा उद्देश काय होता, याचाही तपास सुरू आहे.
एका ई-मेलमुळे नवी मुंबईतील दोन महत्त्वाच्या सार्वजनिक आस्थापनांमध्ये निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






