अनेक हरित उपक्रमांचा अवलंब
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाचा कायापालट होत आहे. त्यात प्रामुख्याने प्रवाशांच्या सुरक्षा आणि सुविधा यांच्यावर भर देण्यात आला आहे. हरित ऊर्जा आणि कचऱ्याची विल्हेवाट यावर भर देण्यात आलेल्या नेरळ जंक्शन स्थानकाला पर्यावरणपूरक, ऊर्जा व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा यांच्यासाठी इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने गोल्ड रेटिंग दिले असून, मुंबई रेल कॉर्पोरेशनने समाधान व्यक्त केले आहे.
नेरळ रेल्वे स्थानक हे नेरळ माथेरान-नेरळ या नॅरोगेजवर चालणाऱ्या पर्वतीय मिनीट्रेनमुळे महत्त्वाचे स्थानक समजले जाते. नेरळ स्थानकातील कायापालटमध्ये शाश्वत स्थानक सुविधा, आरोग्य, स्वच्छता व आरोग्यविषयक व्यवस्था, ऊर्जा कार्यक्षमता, जल कार्यक्षमता, स्मार्ट व हरित उपक्रम तसेच नावीन्य आणि विकास यांचा समावेश आहे. त्यात नेरळ जंक्शन स्थानकात चार ठिकाणी सरकते जिने, चार ठिकाणी उद्वाहने तसेच सात ठिकाणी पादचारी पूल आणि पार्किंगपर्यंत जाण्यासाठी स्काय वॉक अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल नेरळ स्थानकात मुंबई रेल कॉर्पोरेशनकडून टाकण्यात आले आहे. प्रमुख हरित उपक्रम व प्रवासी सुविधा राबविताना 375 केडब्लूपी क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रणालीची उभारणी केली आहे. त्यामुळे ऊर्जा-कार्यक्षम एलईडी प्रकाशयोजना, पंखे आणि स्टार रेटिंग असलेली विद्युत उपकरणे यांना या उर्जेचा फायदा होत आहे.






