तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कल्याणी इंगोले यांचे धाडसी स्टिंग ऑपरेशन
। वावोशी । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभागाने धडक कारवाई केली आहे. वावोशी येथील ‘श्री समर्थ हॉस्पिटल’मध्ये कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत परवाना नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या कथित बोगस डॉक्टरचा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कल्याणी इंगोले यांनी स्वतः रुग्ण बनून स्टिंग ऑपरेशन करत पर्दाफाश केला. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. कल्याणी रमेश इंगोले यांनी गुरुवारी (दि.26) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वावोशी येथील श्री समर्थ हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या वेशात प्रवेश केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अब्दुल रहिम मोहम्मद मुसा शेख (56) याने त्यांची तपासणी करून बाहेरून औषधे आणण्यासाठी चिठ्ठी लिहून दिली, तसेच इंजेक्शन घेण्यासही सांगितले. यानंतर डॉ. इंगोले यांनी आपली खरी ओळख उघड करत संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय पदवी, नोंदणी प्रमाणपत्र व अधिकृत परवाना याबाबत विचारणा केली. आवश्यक वैद्यकीय पात्रता नसल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी खालापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पंचनामा ‘ई-साक्ष्य’ ॲपद्वारे करण्यात आला असून खालापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा विनापरवाना वैद्यकीय व्यावसायिकांविरोधात तालुक्यात व्यापक तपासणी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तर डॉ. कल्याणी इंगोले यांच्या या धाडसी कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.






