सरकारकडून संपर्क; सर्वांना विमानतळावर आणणार
काबूल | वृत्तसंस्था |
काबूलमधील सर्व भारतीय सुरक्षित असून सरकार त्यांच्या संपर्कात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. लवकरच सर्वांना विमानतळावर आणणार येणार आहे, असे भारत सरकारकडून सांगण्यात आले.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तालिबानी दहशतवादी भारतीय कोऑर्डिनेटर जवळ आले. त्यांनी त्याला त्याची ओळख विचारली. त्यानंतर त्याला मारहाण केली. यानंतर दहशतवाद्यांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. तेव्हापासून भारतीय कोऑर्डिनेटरचा फोन बंद आहे.
150 भारतीय बेपत्ता झाले
दरम्यान, 150 भारतीयांचाही पत्ता नव्हता. त्यांना कुठे नेले जात आहे याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. भारतीय कोऑर्डिनेटरचा फोनही बंद येत होता. दरम्यान, सूत्रांच्या हवाल्याने सर्व भारतीय सुरक्षित असल्याचे वृत्त आहे. लवकरच त्या भारतीयांना विमानतळावर परत आणले जाईल. भारत सरकार त्यांच्या संपर्कात आहे, अशी माहिती देण्यात आली.
काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावरुन तालिबान्यांनी ज्या नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. त्यातले अनेक जण भारतीय असल्याची माहिती एएनआयने दिली होती. मात्र त्यानंतर लगेचच खुलासा करत एएनआयने अफगाण माध्यमांच्या हवाल्याने सांगितलं की, अशा प्रकारचं काहीही झालेलं नाही. अफगाणिस्तानमधले सर्व भारतीय तिकडे सुरक्षित असून त्यांना भारतात आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे.
अमेरिकेचा शस्त्रसाठा तालिबान्यांकडे
अफगाणिस्तान ताब्यात घेतलेल्या तालिबान्यांच्या हाती अमेरिकी शस्त्र खजिना आणि उपकरणांचे आयते घबाड लागले आहे. यामुळे निश्चितपणे तालिबानची ताकद वाढली आहे. अफगाणिस्तानच्या सैन्याने सोडलेली सुमारे दोन हजार चिलखती वाहने, 40 विमाने आणि हेलिकॉप्टर्स तसेच ड्रोन, नाईट व्हिजन गॉगल्स यांसारख्या अन्य उपकरणांचा समावेश आहे. अमेरिकी सिनेटर्स तसेच संरक्षण दलांतील वरिष्ठ अधिकार्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.