। अलिबाग । वार्ताहर ।
सखी वन स्टॉप सेंटर रायगड अलिबाग यांच्यातर्फे दि.14 ऑक्टोबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत आगरसुरे येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सखी वन स्टॉप सेंटर मार्फत देण्यात येणार्या सुविधा जसे समुपदेशन, कायदेशीर सहाय्य, वैद्यकीय सेवा, निवासी व्यवस्था, संकटकाळात प्रतिसाद, संकटमुक्तीची सेवा, बालसंगोपन योजना, मनोधैर्य योजना व इतर शासकीय योजनांबद्दल सखी वन स्टॉप सेंटरच्या मनाली म्हात्रे यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच या सर्व सेवा विनामूल्य पुरविल्या जात असून महिलांना कोणतीही समस्या असल्यास त्यांनी वन स्टॉप सेंटर 02141-228560 या दुरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास आगरसुरे येथील महिला बचत गटाच्या दक्षता राऊत, आदिती भोईर, बचत गट सी. आर. पी. शलाका म्हात्रे, समता राऊत व बचत गटाच्या इतर महिला तसेच सखी वन स्टॉप सेंटर रायगड अलिबागचे कर्मचारी उपस्थित होते.